गवंड्याने मार्ग दाखवला...

Dhatukam - Udyam Prakashan    12-Jul-2021   
Total Views |
रोजच्या कामाच्या धबडग्यात अनेक समस्या व्यक्तिगत किंवा उद्योग पातळीवर समोर येत असतात. जेव्हा ती घटना घडते तेव्हा त्याच्याशी संबंधित कर्मचारी एखाद्या फार मोठ्या समस्येला तोंड दिल्यासारखे झटत असतात. परंतु नंतर मात्र त्याचे मूळ कारण अगदीच क्षुल्लक असल्याचे लक्षात येते. अशा सर्व घटनांमधून नक्कीच काही शिक्षण होत असते. अशाच काही गमतीदार आणि गंभीर घटना सांगणारे हे सदर. 
 
 dgdfhgg_1  H x
 
सुमारे पंचेचाळीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. मी त्या वेळी एका इंजिन तयार करणाऱ्या कंपनीत नुकताच नोकरीला लागलो होतो. बहुतेक सर्व कारखान्यांमध्ये प्रॉडक्शन म्हणजे उत्पादन आणि 'क्वालिटी कंट्रोल' म्हणजे गुणवत्ता नियंत्रण ही खाती वेगळी असतात. उत्पादनामध्ये काही दोष असतील तर शॉपवर ते वेळेत दाखविणे हे गुणवत्ता नियंत्रण खात्याचे एक प्रमुख काम असते.
 
 
रेडिएटर बसविलेल्या इंजिनचे प्रातिनिधिक चित्र
कारखान्यात विविध टप्प्यात तयार झालेले यंत्रभाग अॅसेंब्ली, म्हणजे इंजिन जुळणी विभागात येत. त्यापासून तयार झालेले इंजिन चाचणी झाल्यानंतर बाह्य जुळणी विभागात पाठविले जाई. तेथे बाह्य यंत्रभाग बसविल्यानंतर ग्राहकांच्या मागणीनुसार रंगवून ते पॅकिंग करून मग इच्छित ठिकाणी रवाना केले जात असे. मी गुणवत्ता नियंत्रण खात्यात इन्स्पेक्टर म्हणून नोकरीला लागलो आणि काही महिन्यांनी या बाह्य जुळणी विभागात माझी बदली झाली होती. सर्व काम तीन शिफ्टमध्ये चाले अणि अर्थातच संध्याकाळ किंवा रात्रीच्या शिफ्टमध्ये कुतूहल म्हणून इतर काही अभ्यास करण्यासाठी थोडा वेळ मिळत असे.
 
 
एके दिवशी संध्याकाळच्या शिफ्टमध्ये मी एक भले मोठे इंजिन तयार होताना पहात होतो. समोरच्या बाजूस विविध भाग लावले जात होते. खालच्या बाजूचा सपोर्ट, पुढच्या बाजूस फॅन चालविणारी सर्व यंत्रणा आणि त्यानंतर पुढे भला मोठा रेडिएटर बसविला गेला. त्याचे विविध ब्रॅकेट, कूलंटचे पाईप वगैरे बसवून झाल्यानंतर आणि रंगवून झाल्यावर ते इंजिन मोठे दिमाखदार दिसत होते. ते सर्व बघत राहण्याचा मला जणू छंदच जडला होता. पण त्या दिवशी तेथे काही तरी चुकल्यासारखे वाटत होते. बराच वेळ पहात राहिल्यावर मला लक्षात आले. बहुधा तो रेडिएटर थोडा तिरका बसला आहे, असा भास होत होता. मला वाटते तो वरच्या बाजूने थोडा पुढे झुकला असावा. त्यामुळेच असेल कदाचित, पण फॅन अणि रेडिएटरमधील खालचे आणि वरचे अंतर यामध्ये थोडा फरक दिसत होता. मी आजूबाजूच्या इतर लोकांना विचारले, पण मला होणारा 'भास' त्यांना होत नव्हता. या अॅसेंब्लीत काही दोष नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. फॅन आणि रेडिएटरमधील अंतर नेहमी असेच थोडे कमी जास्त असते, असे ते म्हणायला लागले. त्या विभागाच्या प्रमुखानेदेखील हाच पवित्रा घेतला. मी दुसऱ्या विभागात काम करणाऱ्या माझ्या सहकर्मीनाही ते दाखविले, पण त्यांनीदेखील 'असे काही वाटत नाही' असे म्हणून वाटाण्याच्या अक्षता लावल्या. एव्हाना माझ्या या शंकेची सगळीकडे कुचेष्टा होऊ लागली होती. त्याकाळी उत्पादन आणि गुणवत्ता नियंत्रण या विभागांचे 'विळ्या भोपळ्याचे सख्य' असे, याचाही त्यावर परिणाम अर्थातच होत होता. मला आलेली शंका तपासण्यासाठी एवढ्या मोठ्या इंजिनवर काही मोजमापनेदेखील करण्याची काही यंत्रणा नव्हती. त्यामुळे (चरफडत का होईना) गप्प बसणे एवढेच मला शक्य होते.
 
 
पुढचे दोन तीन दिवस हा विषय माझ्या डोक्यातून गेला नाही. कामावरून सायकलवर येता जातानासुद्धा तो 'तिरका' रेडिएटर मनामध्ये मला खुणावत असे. पण हे सगळे तपासायचे कसे, हे कळत नव्हते. कंपनीत विशेष ओळखी नव्हत्या आणि वर ही कुचेष्टा हळूहळू सगळीकडे पसरायला पण लागली होती. तोदेखील एक ताप झाला होता.
 
 
ओळंबा : गवंड्याचे एक साधन. एका दोरीला वरती एक धातूचा तुकडा असतो आणि दुसऱ्या टोकाला गोल आकाराचे वजन असते. बांधली जाणारी भिंत सरळ रेषेत आणि जमिनीला लंब आहे की नाही हे पाहण्यासाठी दोरीची एक बाजू वरती स्थिर पकडून खालच्या बाजूचे वजन लोंबकळत ठेवून दोरी स्थिर झाल्यावर दोरीपासून वरच्या टोकाचे आणि खालच्या टोकाचे अंतर मोजले जाते. त्या अंतरात फरक नसेल तर ती भिंत जमिनीला लंब असल्याचे निश्चित होते.
 
 
त्याकाळी मी रहात असलेल्या आमच्या चाळीच्या शेजारी एक नवीन चाळीचे बांधकाम चालले होते. एके दिवशी कामावरून घरी जाताना गवंडी विटांवर विटा रचताना एक ओळंबा लावून ती भिंत बांधत असताना मी पाहिला. ते पाहताच माझी ट्यूब पेटली आणि मी अक्षरशः दचकलो. मला उपाय सापडला होता. घरी आल्यावर आवरून मी तसाच 'बोहरी आळी'त गेलो आणि गवंडी कामाचा एक ओळंबा विकत घेऊन नंतर कंपनीतील माझ्या लॉकरमध्ये ठेवून दिला.

etryu_1  H x W:
 
 
 
काही दिवसांनी आधी पाहिलेल्या तशाच मोठ्या आकाराचे इंजिन आणि रेडिएटरची जुळणी सुरू झाली. पुन्हा एकदा योगायोगाने तोच दोष मला जाणवला. त्याच आकाराचा हा दुसरा रेडिएटरदेखील वरच्या बाजूने थोडा पुढे झुकला आहे, असा भास होत होता. मी माझी खात्री करून घेत होतो, तसे काही कामगार पुढे झाले. 'काय, हा पण बेंड आहे का?' एकाने कुत्सितपणे विचारले अणि बाकीचे खी खी करून हसायला लागले. पण मी काही न बोलता लॉकरमधून ओळंबा घेऊन आलो आणि त्या रेडिएटरच्या वरच्या बाजूने तो अलगद खाली सोडला. खरोखरच तो पुढच्या बाजूने तिरका होता. ओळंब्याच्या खालच्या बाजूला सुमारे 7 मिमी. अंतर जास्त दिसत होते. फॅन अणि रेडिएटरमधील खालचे आणि वरचे अंतर यामध्ये अर्थातच तितका फरक होता. आता मात्र उत्पादन विभागाच्या प्रमुखांनी हा गुणवत्तादोष असल्याचे मान्य केले. यथावकाश सर्व तपासण्या झाल्यानंतर रेडिएटरच्या निर्मितीमध्ये दोष सापडला. त्याचे निराकरण करण्यात बराच वेळ गेला, एक बॅच पुरवठादाराकडे परत पाठविण्यात आली. आमच्या विभाग प्रमुखांनी माझी आस्थेने चौकशीदेखील केली.
 
 
तात्पर्य : कुठलीही शंका मनात आल्यावर त्याची शहानिशा करावी. केवळ इतर लोकांना पटली नाही म्हणून आपणही बाजूला टाकू नये.
 

अच्युत मेढेकर यांत्रिकी अभियंते असून, त्यांना उत्पादन आणि दर्जा नियंत्रण क्षेत्रातील जवळपास 42 वर्षांचा अनुभव आहे.
9764955599