चेन क्लॅम्पिंग

Udyam Prakashan Marathi    10-Jun-2020
Total Views |
 
 
आमची सेनव्हिजन टेक्नोक्रॅट कंपनी 2000 मध्ये स्थापन झाली. आमच्याकडे टूल रूमच्या कार्याची जाण, कौशल्य तसेच आवड असलेले कर्मचारी आहेत, ज्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची फिक्श्चर बनविली जातात. आम्ही एच.एम.सी. आणि व्ही.एम.सी. मशिनवर वापरण्यासाठी यांत्रिकी आणि स्वयंचलित किंवा हायड्रॉलिक फिक्श्चर बनवितो. तसेच वाहन उद्योगाला लागणारे डिफरन्शियल हाउसिंग, ब्रेक सिलिंडर, स्टेम नट, व्हॉल्व्ह बॉडी इत्यादी सुटे भागसुद्धा आम्ही बनवितो.
 
या लेखात आपण कार्यवस्तू क्लॅम्प करण्यासाठीची एक अभिनव पद्धत पाहणार आहोत. सर्वसाधारणपणे जिग आणि फिक्श्चरमध्ये स्ट्रॅप क्लॅम्प, स्विंग क्लॅम्प, ‘C’ वॉशर, कॅम क्लॅम्प इत्यादी प्रकारचे क्लॅम्प कसे वापरायचे हे आपण अजित देशपांडे यांच्या ‘जिग्ज आणि फिक्श्चर’ या लेखमालेत पाहिले आणि समजावून घेतले आहे. क्लॅम्पसोबतच चेनचा वापर क्लॅम्पिंगसाठी कसा करता येतो हे या लेखात आपण पाहणार आहोत.
 
गेली 5 वर्षे आम्ही चेन क्लॅम्पिंगची फिक्श्चर बनवित आहोत. कार्यवस्तू क्लॅम्प करण्यासाठी सर्वसाधारणपणे नेहमीचे स्ट्रॅप क्लॅम्प वापरले जातात. कार्यवस्तू पकडण्याच्या या पारंपरिक पद्धतीमध्ये अनेकदा अशी अडचण येते की, कार्यवस्तू क्लॅम्प करण्यासाठी जागाच नसते. हाउसिंग, व्हॉल्व्ह बॉडी अनियमित आकाराच्या कार्यवस्तुंसाठी चेन क्लॅम्पिंग वापरले जाते. मोठ्या आणि वेड्यावाकड्या आकाराचे यंत्रभाग मशिनवर लावताना बर्याच वेळेला क्लॅम्प करण्यासाठी व्यवस्थित जागा मिळत नाही आणि मिळाली तरी, कार्यवस्तू आकाराने मोठी असल्यामुळे तिथे पोहोचणे अवघड असते. अशावेळी कर्मचार्यावर ताण येतो किंवा प्रसंगी अपघाताची शक्यता निर्माण होते. काही वेळेस कार्यवस्तुच्या यंत्रणादरम्यान बोअरचा आकार लंबवर्तुळाकार होणे किंवा विरूपण (डिस्टॉर्शन) होऊ शकते. त्याचे कारण म्हणजे, यंत्रभागावर एका विशिष्ट ठिकाणी स्ट्रॅप क्लॅम्पचा एकाग्र (कॉन्सन्ट्रेटेड) भार येतो. त्याच्यावर उपाय म्हणून आम्ही ग्राहकांना चेन क्लॅम्पिंग सुविधा पुरवित आहोत. अर्थात नेहमीच्या फिक्श्चरमध्ये लागणारे रेस्टिंग आणि लोकेशन आवश्यक असतेच. त्याबाबतची तत्त्वे बदलत नाहीत.
 
अवजड वस्तू स्वतःच्या वजनामुळेच व्यवस्थित बसतात. कार्यवस्तुच्या मानाने यंत्रणाचे बल तेवढे नसते. त्यामुळे कार्यवस्तू हलत नाही. अशा परिस्थितीत यंत्रणाची अचूकता वाढविण्यासाठी चेन क्लॅम्पिंगचा चांगला आणि सहजी उपयोग होऊ शकतो.
 
चेन क्लॅम्पिंग केल्यामुळे कार्यवस्तूवर एकाग्र भार पडण्यापेक्षा सगळीकडे एकसारखा भार (युनिफॉर्मली डिस्ट्रिब्युटेड लोड, UDL) पडतो. हा भार सगळीकडे समप्रमाणात विभागला जातो. त्यामुळे कार्यवस्तू व्यवस्थित आणि मजबूतीने पकडली जाते. तिचे विरूपण होत नाही. याची काही स्टँडर्ड डिझाइन आहेत.

3_2  H x W: 0 x 

3_3  H x W: 0 x 

3_1  H x W: 0 x 
 
चेन क्लॅम्पिंगमध्ये एका बाजूला एक स्थिर (फिक्स्ड) हेड असते आणि दुसर्या बाजूला चल (मुव्हेबल) हेड असते. त्यातून क्लॅम्पिंगसाठी आवश्यक ती ॲडजेस्टमेंट करता येते. चित्र क्र. 1 आणि 3 पहा. मुख्यतः हे फिक्श्चरवर होणारे क्लॅम्पिंग असून ते फिक्श्चरचाच एक भाग आहे, ज्याला आपण पकडसाधन (होल्डिंग डिव्हाइस) म्हणतो. 
 
बोअरिंग, मिलिंग, ड्रिलिंग आणि वेल्डिंग यांसारख्या कामांसाठी चेन क्लॅम्पिंग वापरले जाते. चित्र क्र. 2 मध्ये एच.एम.सी.वर वापरले जाणारे फिक्श्चर दिसत आहे.
 
चेन क्लॅम्पचे डिझाइनिंग करताना यंत्रणाचे बल सर्वप्रथम लक्षात घेतले जाते. त्यानंतर मुख्य चेनची क्षमता किती असावी, चेनप्रमाणे खालचे स्थिर टोक (फिक्स्ड एंड) आणि लांबी कमी जास्त होणारे टोक (ॲडजेस्टेबल एंड) लक्षात घेऊन त्याचे डिझाइनिंग केले जाते.

sanjay_2  H x W 
 
कार्यवस्तूप्रमाणे चेनचे माप बदलता येते. मात्र, चेनचा प्रकार सगळीकडे सारखाच वापरला जातो. यामध्ये कार्यवस्तुच्या आकारासंबंधित काहीच मर्यादा नसते. कितीही मोठी कार्यवस्तू यामध्ये पकडता येते. त्यासाठी फक्त चेनची लांबी वाढते.
 
चेन क्लॅम्पिंग हा फिक्श्चरवर फक्त क्लॅम्पिंगसाठीचा पर्याय आहे. पिन, लोकेटर, रेस्टिंग पॅड या सर्व इतर गोष्टी फिक्श्चरवर नेहमीप्रमाणे असतातच.
 
बाजारपेठेमध्ये क्लॅम्पिंगचा हा पर्याय फारसा प्रचलित नाही. कदाचित लोकांच्या मनात असा संभ्रम असावा की जर यंत्रण करताना चेन तुटली तर काय करायचे? याला एकच पर्याय आहे, तो म्हणजे, ज्या प्रमाणे क्रेनच्या चेन, लिफ्टर इत्यादी आपण मान्यताप्राप्त संस्थेकडून वर्षातून एकदा तपासून घेतो. त्याचप्रमाणे या फिक्श्चरची चेनही वर्षातून एकदा तपासणे आवश्यक असते. त्याची माहिती आम्ही ग्राहकाला समजावून सांगतो.
 
कार्यवस्तुला आपण चेनच्या साहाय्याने प्रत्येकवेळी घट्ट पकडतो. कार्यवस्तू पकडली जात असताना, ती चेन ताणली जाते. चेन घट्ट करण्यासाठी टॉर्क सेट केला जातो. हा टॉर्क डिझाइनिंगच्या वेळी यंत्रण बलानुसार (मशिनिंग फोर्स) ठरविला जातो. तसेच ट्रायल अँड एरर मेथड वापरूनसुद्धा टॉर्क निश्चित करता येतो. टॉर्क निश्चित करण्यासाठी डिझाइनर एक रेंज देतात. त्या रेंजमध्ये ते ग्राहकाला टॉर्क निश्चिती करण्याचे सुचवितात. क्लॅम्पचे बल हे चेन आणि कार्यवस्तू यांचा संपर्क कोनावर α (अल्फा) अवलंबून असते. (चित्र क्र. 5). हा अँगल कमी झाला की, क्लॅम्पचे बलसुद्धा कमी होते. या पद्धतीने क्लॅम्प केल्यास वेळेची बचत होते. तसेच देखभालीचा खर्चसुद्धा नगण्यच आहे.

sanjay_3  H x W 
 
करारो इंडिया, अशोक आयर्न या कंपन्यांना आम्ही चेन क्लॅम्पिंग फिक्श्चर करून दिलेले आहे. उत्पादनाच्या गुणवत्तेमुळे ग्राहकांकडून आमच्या उत्पादनासाठी सातत्याने मागणी होत असते. ही पुनर्मागणी हेच जणू काही आमच्या कामाचे प्रशस्तीपत्रक होय.
 
 

sanjay_1  H x W 
संजय बोरसे
संचालक, सेनव्हिजन टेक्नोक्रॅट
0 9970151553
संजय बोरसे यांत्रिकी अभियंते आहेत. सुरुवातीला त्यांनी इलेक्ट्रॉनिका मशिन टूल्स लि. मध्ये काही वर्षे काम केल्यानंतर 2000 साली स्वतःची सेनव्हिजन टेक्नोक्रॅट कंपनी सुरू केली. त्यांना या क्षेत्रातील जवळपास 24 वर्षांचा अनुभव आहे.