आमच्या विषयी

Udyam Prakashan Marathi    07-Nov-2020
Total Views |
 उद्यम प्रकाशन ही तांत्रिक ज्ञान व माहिती देण्याच्या क्षेत्रात गेली 5 वर्षे कार्यरत असलेली एक ‘ना नफा- ना तोटा’ सेक्शन 8 कंपनी आहे.
 
उद्यम प्रकाशन हा उत्पादन क्षेत्रात तांत्रिक ज्ञान आणि माहिती प्रसारित करण्यासाठी समर्पित असलेला अभियंते आणि व्यावसायिकांचा एक कार्यगट आहे. भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये अभियांत्रिकीशी संबंधित तांत्रिक पुस्तके आणि मासिके प्रकाशित करून कारखान्यांमधील सर्वसामान्य तंत्रज्ञांना अद्ययावत तांत्रिक ज्ञान आणि माहिती पोहोचविणे, या उद्देशाने या कंपनीची स्थापना केली गेली आहे.
 
संपूर्ण भारतात हजारो लघु व मध्यम अभियांत्रिकी औद्योगिक एकके (युनिटस्) पसरलेली आहेत. या कारखान्यांमध्ये जरी भरपूर रोजगारनिर्मिती होत असली, तरी तेथील बहुतेक कामगार आणि ऑपरेटर लोकांना इंग्रजी भाषेचे ज्ञान कमी असते किंवा अजिबात नसते. जर त्यांना तांत्रिकदृष्ट्या शिक्षित करून त्यांची कार्यक्षमता वाढवायची असेल, तर सहजपणे समजेल अशा त्यांच्या स्थानिक भाषेतून त्यांना प्रशिक्षण देणे अनिवार्य आहे. अर्थात, त्यासाठी योग्य पुस्तके फार महत्वाची आहेत, म्हणून आमचा कार्यगट MSME क्षेत्रातील विद्यमान आणि नव्याने प्रवेश करणाऱ्याना उपयोगी ठरू शकतील, अशा पुस्तकांवर काम करीत आहे. ही पुस्तके त्यांना त्यांच्या कारखान्यातील कामासाठी आवश्यक अशा ‘उत्तम कार्यपद्धती’ (बेस्ट प्रॅक्टिसेस) शिकण्यास मदत करू शकतात.
मेकॅनिकल हँडबुक, सुलभ यंत्रशाळा, प्रगत यंत्रशाळा आणि असेम्ब्ली – डिसअसेम्ब्ली ही चार पुस्तके प्रकाशित करण्याची आमची तयारी चालू आहे. ही पुस्तके 2021 च्या पहिल्या तिमाहीत प्रकाशित होण्याची शक्यता आहे. कारखान्यातील काम 'बुद्धी/डोके वापरून' करण्याच्या उद्देशाने ही पुस्तके तयार केली गेली आहेत. सीएनसी मशीनची वैशिष्ट्ये आणि त्यांच्या योग्य उपयोगाचे केस स्टडी, यांच्यावर आमच्या आगामी पुस्तकांमध्ये लक्ष केंद्रित केले जाईल. वेगवेगळ्या व्यवसायांचे मूलभूत ज्ञान देणाऱ्या काही पुस्तके/पुस्तिकाही प्रकाशनात असतील.
 
याच दृष्टीने आम्ही जून 2017 मध्ये मराठीत आणि त्यानंतर कन्नड, हिंदी आणि गुजराती भाषेत ‘धातुकाम’ नावाचे मासिक सुरू केले. ही व्यावसायिक मासिके नवीन तंत्र, संबंधित क्षेत्रात होत असलेले नवीन प्रयोग, बाजारात आणलेली नवीन टूल्स व उपकरणे याविषयी महत्वाची माहिती प्रसिद्ध करुन उद्योगास हातभार लावतात. अशा नियतकालिकात एखादी रोचक गोष्ट वाचायला मिळाली, तर ती मित्र आणि सहकारी यांच्याबरोबर शेअर केली जाते. अशा प्रकारे, उद्योगक्षेत्रात नवीन तांत्रिक माहितीचा प्रसार होतो.
 
आमची मासिके मराठीत ‘धातुकाम’, हिंदीमध्ये ‘धातुकार्य’, कन्नडमध्ये ‘लोहकार्य’ आणि गुजरातीत ‘धातुकाम’ या नावाने प्रसिद्ध केली जातात आणि ती ‘मॉडर्न मशीन शॉप’ सारख्या युरोपियन किंवा अमेरिकन मासिकांच्या धर्तीवर आहेत. मशीन टूल्सचा वापर करून यंत्रण केलेले यंत्रभाग निर्माण करण्याच्या सर्व आधुनिक तंत्रांविषयीची अद्ययावत माहिती वाचकांसमवेत शेअर करणे, हे या मासिकांचे मुख्य उद्दिष्ट आहे. या मासिकामध्ये सुधारणा उपक्रम, नवीन उत्पादने, नवीन प्रक्रिया आणि सुधारणांची माहिती देखील दिली जाते. या मासिकाच्या प्रत्येक अंकातून कामगार, पर्यवेक्षक आणि अधिकारी या सगळ्यांना उपयुक्त ज्ञान आणि माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
 
सर्व भाषा मिळून, आम्ही ही मासिके भारतातील सुमारे 50000 लहान आणि मध्यम कारखाने, बड्या कॉर्पोरेट्स आणि तांत्रिक शिक्षणाच्या संस्थांमध्ये वितरित करीत आहोत. याचा निश्चितच एक परिणाम दिसतो आहे आणि वाचकांकडून त्याचे चांगले स्वागत होत आहे. नजीकच्या भविष्यात तमिळ भाषेतही मासिक सुरू करण्याचा आमचा मानस आहे.