लेखन आवाहन

Udyam Prakashan Marathi    10-Nov-2020
Total Views |
उद्यम प्रकाशनने मासिके काढायला सुरुवात करून आता 3.5 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. आतापर्यंत प्रकाशित झालेल्या अंकांमधून 450 पेक्षा जास्त लेख वाचकांपर्यंत पोहोचले आहेत. या लेखांमधून आम्ही नवीन उत्पादनांची माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, कारखाना आणि प्रक्रियेमधील सुधारणा अशा विविध विषयांमधील ज्ञान आणि माहिती वाचकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही अशाच दर्जेदार माहितीसह नवनवीन विषय वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. मासिकामधून मिळालेली माहिती वाचकांना त्यांच्या कामामध्ये उपयुक्त ठरत आहे, अशा सकारात्मक प्रतिक्रिया आमच्याकडे आणि लेखकांकडेही आल्या आहेत. लेखकाने मांडलेल्या सुधारणा अथवा उत्पादनाविषयी वाचक त्यांच्याकडे थेट चौकशी करतात असेही अनुभवास आले आहे. आपले उत्पाद तसेच नवीन तंत्र योग्य ग्राहकापर्यंत पोहोचविण्यामध्ये आमची मासिके विविध उद्योजकांसाठी व्यासपीठ ठरत आहेत. आमची मासिके इंजिनिअरिंग वर्कशॉपशी संबंधित काम करणार्‍या सर्वांसाठी असून महाराष्ट्र, गुजरातसह दक्षिण आणि उत्तर भारतामध्ये मराठी, गुजराथी, हिंदी आणि कन्नड भाषेतून प्रकाशित होत आहेत. लघु, मध्यम उद्योजकांपासून ते कर्मचार्‍यांपर्यंत प्रत्येकाला यातून काही ना काही वाचण्यासारखे मिळावे असा आमचा प्रयत्न आहे. 
या मासिकांमध्ये स्वतःच्या अनुभवावर आधारित लेख मिळावेत अशी आमची अपेक्षा आहे. वर्कशॉपमध्ये काम करताना काही विशेष उत्पादन तंत्रे वापरली, काही कल्पना वापरून उत्पादन खर्च कमी केला, काही नियोजन करून आहे त्या सामग्रीतून जास्त उत्पादन घेतले, अशा प्रकारच्या अनेक सुधारणा आपल्या कारखान्यांमध्ये प्रत्यक्षात घडलेल्या असतील. त्याचबरोबर शॉपवर काम करताना अनेक गंमतीदार घटना घडत असतात. त्यामध्ये कार्यपद्धती किंवा चुकीचे आकलन किंवा समजूतीचे घोटाळे अशा कित्येक कारणांचा समावेश असतो. परंतु या सर्व किश्शांमधून आपल्याला काही शिक्षण मिळत असते, तसेच नवीन अनुभव येत असतात. ते अनुभव, तसेच आपल्या नवीन उत्पादन आणि तंत्राविषयीची माहिती 50,000 हून अधिक कंपन्यांमधील वाचकांपर्यंत पोहोचवायला आम्हाला नक्कीच आवडेल. 
आपण इंजिनिअर आहोत किंवा कारखान्यात काम करणारे आहोत त्यामुळे लेखन हा आपला प्रांत नाही, असा फार मोठा गैरसमज प्रचलित आहे. वास्तविक पाहता आपल्याला जे सांगायचे आहे ते सांगण्याचे अनेक मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहेत. आपण आपल्याला द्यावीशी वाटणारी माहिती तुम्हाला सुलभ वाटेल अशा भाषेतून लिहून पाठवू शकता किंवा आपल्या फोनमध्ये त्याचे ध्वनीमुद्रण करून आमच्याकडे पाठवू शकता. आपल्याकडून आलेल्या कच्चा मसुद्यावर आमच्याकडील लेखनकुशल सहकारी काम करून सुधारित मसुदा तुमच्याकडे पाठवतील आणि तो मसुदा छापण्यायोग्य करण्याकरीता सर्व प्रकारचे सहकार्य करतील. 
आपल्याकडील कार्यसंस्कृती अधिक प्रगल्भ आणि ज्ञानसमृद्ध होण्यासाठी सुरू केलेल्या या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे हीच आमची अपेक्षा आहे. आपल्याकडून वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार माहिती मिळेल याची खात्री आहे. त्यासाठी कृपया पुढील दूरध्वनी क्रमांकावर अथवा इमेलवर संपर्क साधावा. 
दूरध्वनी क्र. + 91 9359104060
इमेल : [email protected]